महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था गेली १२३ वर्षे उत्कृष्ट मराठी ग्रंथांना पुरस्कार देऊन उत्तेजन देण्याचे कार्य करीत आहे. ही संस्था महाराष्ट्रातील सर्वांत जुनी साहित्य संस्था आहे. आधुनिक महाराष्ट्राचे आद्द्य प्रवर्तक न्या. महादेव गोविंद रानडे, जागतिक कीर्तीचे संस्कृत पंडित डॉ. सर रामकृष्ण भांडारकर, प्रसिद्ध कादंबरीकार हरि नरायण आपटे, भारतीय अशांततेचे जनक लो. बाळ गंगाधर टिळक इत्यादी पंचवीस द्रष्ट्या महाराष्ट्रीय समाजधुरीणांनी ही संस्था इ. स. १८९४ मध्ये २९ ऑक्टोबर रोजी स्थापन केली. मराठी भाषेच्या आणि साहित्याच्या अभ्युदयासाठी कार्य करण्याचे उद्दिष्ट त्यामागे होते. त्यावेळी संस्थेचे नाव ठेवले डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी.
पेशवे सरकार दरवर्षी चातुर्मासात विद्वानांना दक्षिणा देत असे. त्यात वैदिक विद्वान, इतर पंथीय विद्वान आणि अन्य धर्मातील पंडितांचा समावेश असे. इंग्रजी राज्य सुरू झाल्यावर लॉर्ड एल्फिन्स्टन या पहिल्या गव्हर्नरने ही प्रथा पुढे चालू ठेवली. त्यानंतर तत्कालीन मुंबई सरकारने दक्षिणा फंड म्हणून सरकारात स्वतंत्र निधी ठेवला. त्यातून शिक्षणास उत्तेजन व मराठी ग्रंथास पुरस्कार मिळू लागला. योग्य ग्रंथाची शिफारस करण्यासाठी सरकारने इ. स. १८५१ मध्ये दक्षिणा प्राईझ कमिटी या नावाची एक समिती स्थापन केली.
इ. स. १८९४ मध्ये संस्था स्थापन झाल्यावर पुढील वर्षीच म्हणजे १८९५ मध्ये सरकारच्या दक्षिणा प्राईझ कमिटीचे सर्व काम संस्थेकडे आले. इ. स. १८८७ पासून कमिटीकडे आलेली १०२ पुस्तकेही त्यावेळी संस्थेकडे पारितोषिकाच्या शिफारसीसाठी सुपूर्त करण्यात आली. तेव्हापासून मुंबई सरकार मराठी ग्रंथांना पुरस्कार देत असे, त्याची शिफारस करण्याचे काम संस्थेकडे आले.
इ. स. १९४८ मध्ये संस्थेचे इंग्रजी नाव बदलून ‘महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था’ असे मराठी नामकरण करावे, असा ठराव संस्थेने मंजूर केला आणि त्यानुसार मराठी नावाचा व्यवहारात वापर सुरू झाला.