संस्थेच्या आगामी योजना

  • दक्षिणा भवन: वनाझ कंपनीचे पूर्वीचे मालक कै. सं. कै. खांडेकर यांनी जिल्हाधिकारी, पुणे यांच्यामार्फत संस्थेस १०००० चौरस फूट जमीन देणगी म्हणून दिली आहे. पुण्यात पौड रस्त्यावर चांदणी चौकाजवळ वेदभवनच्या शेजारी ही जमीन आहे. त्यावर ‘दक्षिणाभवन’ ही वास्तू उभारण्याची योजना तयार आहे. भवनाची प्रतिकृतीही तयार करून घेतली आहे. संस्थेचे कार्यालय, सभागृह, ग्रंथालय, वाचनालय, अभ्यासिका, पुण्याबाहेरील पाहुण्यांची राहण्याची सोय, अशी विविध दालनं त्यात योजली आहेत. वास्तूच्या आराखड्याप्रमाणे पाहता खर्चाचा आकडा कोटींच्या घरात जाईल, असा अंदाज आहे.
  • सिंहावलोकन व्याख्यानमाला: दरवर्षी मार्च महिन्यात बी.ए. व एम. ए. च्या विद्यार्थ्यांसाठी ‘सिंहावलोकन व्याख्यानमाला’ सुरू करायची आहे. विद्यार्थ्यांबरोबरच मराठीचे सर्व चाहते व अभ्यासक यांना ही व्याख्याने खुली असतील. अभ्यासक्रमाशी निगडित अशा या व्याख्यानांचा इतरेजनांनाही अभ्यास व जिज्ञासापूर्ती या दृष्टीने लाभ होऊ शकेल.
  • भाषा शुद्धी मोहीम: वृत्तपत्रे, रस्त्यांवरील पाट्या अशा सार्वजनिक ठिकाणी अशुद्ध भाषेचा वापर टाळण्यासाठी भाषाशुद्धी मोहीम राबविण्याचे ठरविले आहे.
  • वाचक स्पर्धा: चांगले ग्रंथ कोणते हे पारखणं आणि त्यांचं चिकित्सक परीक्षण करणं ही क्षमता मराठी माणसात वाढीस लावण्याच्या दृष्टीने वाचक स्पर्धा घेण्यात येणार आहे.
  • कागदपत्रांचे जतन: संस्थेजवळील जुन्या ऐतिहासिक महत्त्वाच्या कागदपत्रांचे जतन करण्याच्या दृष्टीने लॅमिनेशन करायचे आहे. काही कागदपत्रांचे लॅमिनेशन करून झाल्यावर अर्थसाहाय्याअभावी सदर योजना अर्धवट पडून आहे.
  • आस्थापना: कार्यालयीन कामकाजाची वेळ वाढवून सेवकांची संख्याही वाढवणे, विद्यमान सेवकांना वेतनवाढ देणे.
  • पारितोषिके: ग्रंथपारितोषिकांची रक्कम वाढवणे.