न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी इ.स. 1894 मध्ये पुण्यात स्थापन केलेल्या महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था या संस्थेकडे बरीच जुनी कागदपत्रे, पुस्तक परीक्षणे, हस्तलिखित पुस्तके संग्रही आहेत. कागद पत्रांमध्ये लेखकांनी संस्थेला लिहिलेली पत्रे, गव्हर्नर वैगेरे सरकारी अधिकार्यांशी झालेला पत्रव्यवहार, संस्थेकडे पारितोषिकासाठी आलेल्या पुस्तकांची परिक्षणे, तसेच हस्तलिखित पुस्तकांत शिंदे घराण्याचा पद्यमय इतिहास आहे. न्या. रानडे यांनी दीर्घकाळ झगडून ब्रिटिश सरकारकडून पेशवे दप्तर मिळवले होते, ते विसाव्या शतकाच्या सुरुवातीस छापून प्रसिध्द करण्यात आले, त्यांचे नऊ भाग संस्थेकडे आहेत.
या एकंदर संग्रहातील अंशात्मक भाग जरी नजरेखालून घातला तरी खूपच उद्बोधक माहिती हाती लागते. भाषा, इतिहास, समाज, वाड.मय या संदर्भात अभ्यासकांना ती महत्त्वाची वाटेल असे त्याचे मूल्य आहे.
या पुढील लेखातून परीक्षणे आणि पत्रव्यवहार यांच्या फायली आपण चाळणार आहोत. अभ्यासकांना हे सर्व उपयुक्त वाटले, त्यात रस वाटला तर त्यांनी संस्थेच्या कार्यालयात येऊन हा जुना ठेवा अवश्य पाहावा, अभ्यासावा. त्यांना विनामूल्य सेवा दिली जाईल. काही निवडक परीक्षणे पाहू.
महाराष्ट्राचा पुण्यग्राम हे वि. वि. करमरकर यांनी लिहिलेले पुस्तक 1926 मधे पारितोषिकासाठी संस्थेकडे आले. त्यावर तीन परीक्षकांनी परीक्षण लिहिले.
एक परीक्षक म्हणतात – या पुस्तकात पुण्याचा थोडा प्राचीन इतिहास देऊन शहरातील पेठांची, संस्थांची, स्थळांची माहिती दिली आहे. ती अत्यंत संक्षिप्त आहे. प्राथमिक शाळेतील मुलास उपयोगी पडेल अशी आहे. पुणे गॅझेटियर घेऊन त्यातून ही माहिती उद्धृत केली आहे. चित्रे, नकाशे, भरपूर माहिती यायोगे ते अधिक उपयुक्त करता आले असते. पारितोषिक देण्यासारखा कोणताही गुण नाही.
दुसरे परीक्षण – माहिती त्रोटक आहे. बर्याच स्थळांची वर्णने नाहीत. पूर्वी गायकवाड यांनी पुणे शहराचे वर्णन म्हणून प्रसिध्द केलेले पुस्तक यापेक्षा भरपूर माहितीचे आहे. ऐतिहासिक दृष्ट्या यातील माहिती काहीच नाही, असे वाटते. भाषा साधारण, वाड्मयात नवी भर नाही. बक्षिस देऊ नये.
तिसरे परीक्षण – अनेक महत्त्वाच्या इमारती व संस्थांचा उल्लेख नाही. उदा. फर्ग्युसन कॉलेज, सर्व्हंटस ऑफ इंडिया सोसायटी, भांडारकर संस्था, पंचहौद मिशन, मिशन हॅस्पिटल, नवी पेठ, न्यू पूना कॉलेज, लष्कर. पेशवाई बुडाल्यानंतर ‘पुणे शहर’ नावाचे पुस्तक एका ख्रिस्ती लेखकाने प्रसिध्द केले होते. त्यावरून त्या काळातील कल्पना वाचून आज काही गोष्टींबद्दल आश्चर्य वाटते. येथील प्रमुख लोक, त्यांचे संस्थांच्या रुपाने उद्दोग, मुख्य चळवळी, वर्तमानपत्रे, लायब्रर्या यांचा प्रस्तुत पुस्तकात उल्लेख नाही. पण हा भाग हरि रघुनाथ भागवत यांनी पुण्यासंबंधीच्या आपल्या पुस्तकात लिहिला आहे. तो वाचकांना जास्त मनोरंजक वाटेल. प्रस्तुत पुस्तक उपयुक्त असल्याने अल्प बक्षिस द्यावे.
पुण्यासंबंधी आणखी तीन पुस्तके यापूर्वीच प्रसिध्द झालेली आहेत, ही माहिती आपल्याला वरील परीक्षणातून समजते. पुण्याविषयीच्या अभ्यासकांना संशोधनासाठी ही माहिती उपयुक्त ठरेल असे वाटते.
संगीत विवाह रहस्य या नावाचे नाटकाचे पुस्तक सन 1926 मध्ये पारितोषिकासाठी आले होते. त्यावर परीक्षकांचे म्हणणे असे –
प्रस्तुत नाटक अगदी साधारण दर्जाचे आहे. सामाजिक नाटकाच्या लेखकात आवश्यक असलेले सूक्ष्म समाज निरीक्षण कोठेच दिसत नाही. रुढ विवाह पध्दतीपेक्षा पाश्चात्यांची प्रीती विवाह पध्दती अनुकरणीय ठरवताना एकांगी विचार दिसतो. विवाहासारख्या महत्त्वाच्या संस्कारावर लिहिताना लेखकावर एक प्रकारची जबाबदारी असते ही जबाबदारीची जाणीव प्रस्तुत लेखकात जागृत दिसत नाही. स्वभावपरिपोष, कथानक मांडणी, रसपरिपोष, भाषा वगैरे बाबतीत लेखकाचा नवशिकेपणा जाणवतो. लग्नापूर्वी परपुरषाला आलिंगन हे आपल्या संस्कृतीत विपरीत वाटणार, रंगभूमीच्या दृष्टीने कथानक सदोष आहे. सर्व दृष्टीने विचार करता नाटक बक्षिसपात्र नाही.
नाट्यलेखनाकडे किती दृष्टींनी पाहणे आवश्यक आहे, ते या परिक्षणातून दिसून येते. मोजक्या शब्दात परीक्षकाने बरेच काही सांगितले आहे. ‘लग्नापूर्वी परपुरुषाला आलिंगन’ ही गोष्ट परीक्षकाला खटकली, पण लेखकाला नाही. यावरून सामाजिक दृष्ट्या तो संक्रमण काळ होता, हे लक्षात येते. (या पुस्तकावरील एकच परीक्षण उपल्बध आहे.)
‘हुंड्याचा हंडा’ हे आणखी एक नाटक सन 1930 मध्ये पारितोषिकासाठी आले. विनायक कृष्ण सुभेदार या पंधरा वर्षे वयाच्या मुलाने ते लिहिले आहे. चार अंकी पण सत्तावीस पानी हे छोटे पुस्तक त्याच्या वडीलांनी मुलाच्या मृत्यूनंतर त्याची स्मृती म्हणून छापले आहे. हुंड्याच्या दुष्ट चाली पासून एका कुटुंबावर कशा प्रकारचा प्रसंग ओढवला त्याचे हे हृदयद्रावक चित्र आहे. बालग्रंथकारास उचित असे हे आहे. एका परीक्षकाने म्हटले आहे – नाटक स्वतंत्रपणे लिहिले आहे. भाषा शुध्द व सोपी आहे. आक्षेपार्ह असे काही नाही. पुस्तक बरे आहे बक्षिस द्यावे असे वाटत नाही.
दुसर्या परीक्षकाने महत्त्वपूर्ण शेरा मारला आहे. तो म्हणतो, हा लेखक जगला असता तर त्याचे हातून उच्च दर्जाची साहित्य सेवा घडली असती. दहा रूपये बक्षिस देण्यास हरकत नाही.
सायकलचे परिणाम (सन 1930)
शरीररचना, सायकलचे फायदे व दुष्परिणाम, ते लक्षात ठेवण्याचे नियम, उपाय वगैरे विषय हाताळले आहेत. एका परीक्षकाने म्हटले आहे, सायकल वापरणार्यांनी एकदा तरी वाचावे, किंवा संग्रही ठेवावे असे हे पुस्तक आहे. सवड असल्यास 20 – 25 रू. पर्यंत बक्षिस द्यावे.
दुसर्या परीक्षकाने म्हटले आहे, सायकलचा वापर अलीकडे अशिक्षित वर्गात जास्त दिसतो. शिकलेले थोडे आढळतात.
पंचाऐंशी वर्षांपूर्वी सायकलवर पुस्तक लिहीले गेले होते आणि त्या काळात सायकलचा वापर अशिक्षितात जास्त होता, ही माहिती या परीक्षणातून आपणांस मिळते. दर दहा पंधरा मैलावर भाषा बदलते, म्हणतात. तशी कालानुसार सुध्दा बदलते. सवड असल्यास 20-25 रु. पर्यंत बक्षिस द्दयावे, असा उल्लेख एका परीक्षणात आहे. वेळ असेल तर अशा अर्थी सवड शब्द आज आपण वापरतो. परंतु या परीक्षणात शक्य असेल तर या अर्थी वापरला आहे. अर्थाच्या छटा कशा थोड्या थोड्या बदलत जातात, ते यावरुन दिसून येते.
श्री शारदा दूतिका (उत्तरार्ध)
कवि – दत्तात्रय अनंत आपटे
वै.का.राजवाडे यांनी 30-10-1914 रोजी परीक्षण लिहिले ते त्यांच्याच शब्दात -
या काव्यातले दोष काढता काढता मला कंटाळा आला, निरर्थक शब्दः लंभन (लाभ) सौख्यकदंबा (स्त्रीलिंगी) अपसव्यांग (डावीबाजू) मालिका (माळी)..असे भलत्या अर्थी किंवा अशुध्द लिहिलेले, व्याकरणाने किंवा नवीन बनविलेले शब्द ज्यांचा अन्वय लागत नाही किंवा ज्यात शब्द भलते ठिकाणी घातले आहेत असे प्रयोग कशा तरी ओढून आणलेल्या कल्पना व गद्दयाला योग्य अशी जाग जागी घातलेली भाषा... हे सर्व लक्षात घेऊन ह्या लेखकाला काव्याची खरी कल्पना येण्यास त्याने किती तरी उत्तम काव्याचे परिशीलन आणि तेही किती तरी काळ केले पाहिजे असे कोणी तरी सुचवावे, असे प्रथम मनात आले. कारण असे न केल्यास आणखीही परीक्षणासाठी अशीच काव्ये सोसायटीकडे येतील आणि माझ्या सारख्यांना उगाच त्रास होईल. पण हे नाजूक काम कोणीही पत्करणार नाही, अशी खात्री असल्यामुळे सध्या मी एवढेच म्हणतो की हे काव्य बक्षिसास अगदीच अपात्र आहे. ज्या विचित्र कल्पनांमुळे माझ्या मनाचा या काव्याविरुध्द कल झाला त्याचे थोडे मासले देतो. –
शारदा दिसल्याबरोबर कवि म्हणतो –
मान मनाची अपाप लवुनी ध्यानमग्न ते झाले
भावे अर्चुनी वाक् देवाला वंदन शतदा केले
या ओळीत मनाला मान दिली आहे. मन ती मान लवविते व शंभरवेळा नमस्कार करिते. मनाला मान असते या कल्पनेने कोलरीजने आपल्या एका ग्रंथात एका दुकानदाराने रचलेल्या दोन ओळी दिल्या आहेत, त्याची आठवण येते. हा दुकानदार जिच्यावर प्रेम करतो ती त्याच्याकडे ढुंकूनही पाहात नाही. तेव्हा त्रासून तो म्हणतो - आता मला हा प्रेमाचा त्रास नको माझ्या अन्तःकरणाची तंगडी त्याच्या शृंखलेने बांधून घेणार नाही. अन्तःकरणाची तंगडी व मनाची मान या कल्पना सारख्याच हास्योत्पादक आहेत. झाडे पर्वताच्या निरनिराळ्या भागांवर असतात. या बद्दल कवि म्हणतो-
काहींना निजशिरी काहींना धरीतो आपुल्या हाती
स्कंधी खेळवी कुणास तुडवी करणा चरणा घाती.
पर्वताचे पाय कोणते व हात कोणते, झाडांना पायाखाली केव्हा तुडवितो?
राजवाडे यांनी अशी आणखी एक दोन उदाहरणे देऊन शेवटी म्हटले आहे, अशा कल्पनांमुळे उत्प्रेक्षांचे दोन चार ठिकाणी लांब च-हाट ओढल्यामुळे व भाषा व विचार गद्याला योग्य असल्यामुळे या ग्रंथाला बक्षिस देऊ नये.
दुसरे परीक्षण आ.स.दळवी यांचे आहे. ते लिहितात, रा. आपटे हे अनंत तनय या नावाने प्रसिध्द कवि आहेतच. त्यांचे हे काव्य पूर्वार्धासारखे सरस झाले आहे. आणि सोसायटीकडून बक्षिस देण्यास पूर्णपणे योग्य आहे.
एखादा ग्रंथ परीक्षणासाठी कोणाकडे द्यावा, हे ठरविणे किती महत्त्वाचे आहे, ही गोष्ट वरील दोन परीक्षणांवरुन लक्षात येऊ शकेल. राजवाडे यांची विद्वत्ता, व्यासंग, बहुश्रुतता आणि स्पष्टवक्तेपणा त्यांच्या परीक्षणातून दिसून येतो. कोलेरिजच्या लिखाणातील दिलेलं उदाहरण येथे चपखल बसतं. बक्षिस देऊ नये, असे सांगताना त्यांनी दोषांची सोदाहरण चर्चा केली आहे. भाषा विचार कल्पना काव्याला योग्य नाही, हेही त्यांनी सांगितले आहे. दोषपूर्ण शब्दांचाही उल्लेख केला आहे. त्यांचं परीक्षण आदर्श आहे असं म्हणता येईल.
श्रुतिबोध या ग्रंथावर वै.का.राजवाडे यांनी परीक्षण लिहिले आहे. परीक्षणाच्या शेवटी, वै.का.राजवाडे (सही) फर्गुसन कॉलेज, 3 ऑगस्ट 1914 असे लिहिले आहे. परीक्षण त्यांच्याच शब्दात असे -
ऋग्वेदाचे अमुक त-हेने केलेले भाषांतर बरोबर अमुक त-हेने केलेले चुकीचे असे म्हणणे योग्य होणार नाही. कारण कित्येक शब्द दुर्बोध झालेले आहेत. कित्येक ठिकाणी अन्वय लावणे कठिण जाते. सायणही एकाच शब्दाचे निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळे अर्थ देतो. हल्लीच्या विद्वानांमध्येही अर्थासंबंधी फरक पडतो. श्रुतिबोधकारांनी काही काही ठिकाणी केलेले भाषांतर मला पसंत पडले नाही. तथापि ते चुकीचे आहे असे म्हणण्याचे धाडस मी करणार नाही. पहिल्या काही ऋचांमध्ये भक्त, भक्ति वगैरे शब्द घालून वेदामध्ये भक्तिरस भरला, असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तो माझ्या मते बरोबर नाही. अग्नी, इंद्र वगैरेंची स्तुती केली आहे व काही गोष्टी विषयी विनवणी केली आहे एवढेच काय ते म्हणता येईल. अग्निमीळे या ऋचे मध्ये अग्नीला पुरोहीत, ऋत्विक, होता अशी विशेषणे लावली आहेत. यज्ञातील या संज्ञा विशिष्ट अर्थी त्या काळी रुढ झाल्या असल्या पाहिजेत. त्यांचा यौगिक अर्थ घेणे चुकीचे होईल. पण तसे यौगिक अर्थ भाषांतरात घेतले आहेत. पहिल्या तीन अंकात ऋचेचा अन्वय न देता नुसता अर्थ दिला आहे. पुढच्या अंकापासून अन्वय देण्यास सुरवात केली आहे ते यथायोग्य आहे.
‘वेदकालिन सुधारणा तारायंत्र वगैरेंनी मोजणे म्हणजे तिला कमीपणा आणणे, जर्मन लोक वेदाचा अभ्यास करतात, ह्यावरून वेदात काही विशेष अर्थ असला पाहिजे, वेदांसारखे माधुर्य प्रचुर काव्य दुसरे कोणतेच नसेल’, अशी विधाने विचारी मनुष्य बहुतकरून करणार नाही. छपाई जितकी चांगली असावी, तितकी नाही. निदान संहिता व पादपाठ ही अतिशय शुध्द असावयास हवी होती. ऋगवेदाच्या भाषांतरासारखे बिकट भाषांतर दुसरे कोणतेही नसेल. भाषांतराची 508 पृष्ठे सोसायटीकडे आली आहेत. पृष्ठास बारा आणे देणे अप्रशस्त होणार नाही. त्या हिशेबाने रु. 381 होतात. इतके बक्षिस भाषांतरकर्त्यास द्यावे.
याच पुस्तकावर दुसरे परीक्षण वि.स.घाटे डेक्कन कॉलेज यांचे असून त्यावर दिनांक आहे 9-6-1914.
आपला अत्यंत पूज्य व पुरातन ग्रंथ जो ऋग्वेद त्याचे मराठी रुपांतर करण्याचा प्रयत्न अत्यंत उपयुक्त व प्रशंसनीय आहे, यात शंका नाही. भाषांतर एकंदरीत बरे झाले आहे. पुष्कळ ठिकाणी भाषांतर योग्य किंवा अयोग्य याबद्दल मतभेद असणे अत्यंत संभवनीय आहे. परंतु भाषेच्या स्वरुपाकडे नजर फेकली असता अशा त-हेचा मतभेद अपरिहार्य आहे. निरनिराळी जर्मन, इंग्रजी भाषांतरे पाहून व त्यातून योग्य ते निवड़ून तेच वाचकास सादर करावयाचे अशा त-हेचा प्रयत्न केलेला दिसत नाही. ...मराठी वाचकांचे लक्ष्य ऋग्वेदाकडे ओढण्याचे अत्यंत... कार्य श्रुतिबोधापासून होत आहे. या करिता त्यास 200 रु. बक्षिस देण्याची मी शिफारस करतो.
राजवाडे यांचे परीक्षण खूप सविस्तर नसले तरी त्यात अनेक मुद्द्यांचा उहापोह केला आहे. स्वतःची मते न लादता त्रयस्थपणे विचार केला आहे. काही ठिकाणचे भाषांतर मला पसंत नाही. तथापि ते चुकीचे आहे असे म्हणण्याचे धाडस मी करणार नाही. हे वाक्य माझ्या म्हणण्याची प्रचिती देईलच. जे निश्चितपणे चूक आहे, त्यास चूक म्हणून, योग्य तिथे योग्य म्हटले आहे. दुसरे परीक्षक घाटे यांनासुध्दा भाषांतरा बद्दल शंका वाटते. राजवाडेंप्रमाणे त्यांनीही तो दोष न मानता मतभेदाचा मुद्दा म्हटले आहे. हे भाषांतर म्हणजे बांडगुळे नव्हे, हा नवा मुद्दा त्यांनी मांडला आहे.
अस्पृश्य विचार
लेखक – श्री. म. माटे
31-10-22 रोजी लिहिलेले परीक्षण
परीक्षकाचे नाव कळू शकत नाही.
परीक्षकाच्या शब्दात - विषयाचे विवेचन वाचणार्याच्या मनाला पटेल अशा प्रकारे केलेले आहे. भाषा वक्तृत्व पूर्ण असून विचारसरणी सुसंबध्द व तर्कशुध्द आहे. निर्णय अस्पृशांस जवळ करावे असा आहे. या विरुध्द मत असणार्या लोकांचे शक्य असणारे सर्व आक्षेप लेखकाने कल्पनेने उद्धृत करुन त्या सर्वांस बिनतोड उत्तरे देऊन निःपक्षपाती वाचकास निःसंदेह केले आहे, यात संशय नाही. अस्पृश्यतेच्या फैलावामुळे हिंदी समाजाच्या राजकीय हिताचे अगणित नुकसान झाले आहे, हे फारच मार्मिक रीतीने वर्णिले आहे. त्याचप्रमाणे हिंदी राष्ट्राच्या हितशत्रूंस अस्पृश्यतेच्या रुढीमुळे राष्ट्रीय भावनेस दडपून टाकण्यास अनुकूल परिस्थिती कशी सहज प्राप्त झाली आहे व तिचा ते कसा फायदा घेत आहेत याचे भेसूर चित्र लेखकाने मोठ्या कुशलतेने हृदयस्पर्शी भाषेत रेखाटले आहे. इतके असूनही लेखक विषयाची दुसरी बाजू विसरलेला नाही. केवळ उच्च वर्णांकडेच सर्वतोपरी दोष आहे व अस्पृश्य मानलेल्या जातींवरील अस्पृश्यतेचा शिक्का काढून घ्यायचाच अवकाश की सर्व ठीक होईल, असे मानणारा हा लेखक नाही. अस्पृश्य जातींना आपली रहाणी, वागणूक, नैतिक कल्पना, ज्ञान सुधारण्याकरीता किती प्रयत्न केले पाहिजेत व अशी सर्व बाजूंनी सुधारणा केल्याशिवाय नुसत्या ब्राह्मणांस व एकंदर उच्च मानिलेल्या जातीस शिव्या देऊन भागावयाचे नाही हेही लेखकाने निर्भीड रीतीने पुढे मांडीले आहे. एकंदरीने या विषयासंबंधाने लेखकास विलक्षण कळकळ आहे. विषयाचे प्रतिपादन फारच परिणामकारक झाले आहे. माझ्या मते अशा पुस्तकास 50 रु. पर्यंत पारितोषिक द्यावे.
दुसरे परीक्षण आ.स.दळवी यांनी दि. 17-10-1922 रोजी लिहिले आहे. परीक्षण त्यांच्याच शब्दात असे –
रा.श्री. म. माटे, एम.ए. यांचे अस्पृश्य विचार हे छोटे पुस्तक वाचून पाहिले. अस्पृश्यांच्या निरनिराळ्या जाती, त्यांची लोकसंख्या, त्यांची राहणी, त्यांचे उद्दोग धंदे व त्यांची शोचनीय स्थिती या विषयी माटे यांनी मोठ्या कळकळीने विवेचन केले आहे. त्यांना ही स्थिती कशी प्राप्त झाली याचा विचार करताना जुन्या वर्णाश्रम धर्मावर व ते कथन करणार्या शास्त्रकारांवर रा. माट्यांनी तोंडसुख घेतले आहे. परंतु जी व्यवस्था प्राचीन काळी होऊन गेली ती अंमलात आणणार्यांना आता शिव्या देऊन ती सुधारता येईल असे रा.माट्यांना वाटत असेल तर ती त्यांची चूक आहे. अस्पृश्यांचे अस्पृश्यतेपासून कसे निवारण करावे, ह्या विषयी योग्य उपाय सुचविण्याचे व ते कोणी व कसे अंमलात आणावयाचे ह्याचा विचार करण्याचे रा.माटे यांचे मुख्य कर्तव्य होते. परंतु ते त्यांनी योग्य रीतीने बजावले नाही, हे येथे नमूद केले पाहिजे. सबब हे पुस्तक बक्षिस देण्यास योग्य आहे असे मला वाटत नाही.
पहिले निनावी परीक्षण वाचता क्षणी आपल्या लक्षात येते की, पुस्तकाच्या लेखकाने, पुस्तक-विषयाचा सर्व बाजूंनी विचार केला आहे. याचाच अर्थ असा की, परीक्षकानेही पुस्तकाचा सर्व अंगांनी विचार करुन समतोल परीक्षण केले आहे. लेखकाची भाषा, त्याचे विचार कसे आहेत, हे सांगून लेखकास प्रतिपाद्य विषयासंबंधी किती तळमळ आहे, याचाही उल्लेख केला आहे. अस्पृश्यतेचे चित्र भेसूर असून अस्पृश्य जातींना त्यांच्या सुधारणेसाठी विविध क्षेत्रात खूपच प्रयत्न करायला हवेत, हेही नमूद केले असून अंतिमतः या लिखाणाचा निर्णयसुध्दा लेखकाने सांगितला आहे, याची दखल परीक्षकाने घेतली आहे. म्हणूनच असे म्हणता येईल की, परीक्षकाने पाल्हाळ न लावता मोजक्याच शब्दात पुस्तकाचे चित्र चांगले रेखाटले आहे. पारितोषिकाचा निर्णय करण्यास ते उपयुक्त ठरेल असे आहे.
दुसरे परीक्षक दळवी यांचे परीक्षण एकांगी आणि पारितोषिक द्यावे की नाही याचा निर्णय करणार्यांची दिशाभूल करणारे आहे असे वाटते. वर्णाश्रम धर्म आणि कास्तकार यांच्या विषयी लेखकाने जे लिहिले आहे त्यामुळे चिडून जाऊन परीक्षण लिहीले आहे असे जाणवते. आपली मते, भावना आणि विचार बाजूला ठेवून परीक्षण करणे आवश्यक आहे.
‘कुलाब्याची दांडी’ या प्रा.ना.सी. फडके यांच्या कादंबरीवरील परीक्षण 3-6-1926 रोजी लिहिलेले. परीक्षकाचे नाव नाही, एकच परीक्षण आढळले ते असे –
भाषा मोहक आणि चटकदार. वर्णने बरी आहेत. लेखक कसलेला आहे. पण स्वभाव वैचित्य, स्वभाव परिपोष सापडत नाही. सामाजिक कादंबरीत उच्च ध्येय हवे व रुढ दोष दाखवले पाहिजेत तर उपयुक्तता वाढते. ब्राम्हण कुमारिकेची गर्भपात शस्त्रक्रिया दाखवणे वाड्मय दृष्ट्या योग्य नव्हे.
कादंबरी सरस उठलेली नाही, सध्या बर्यावाईट कादंबर्यांचा सुळसुळाट आहे. म्हणून विशेष गुण असल्याशिवाय कादंबरीला बक्षिस देऊ नये. ही कादंबरी दुय्यम प्रतीची आहे. नावाजलेल्या लेखकाने बरी कादंबरी लिहिली म्हणून पारितोषिक देणे श्रेयस्कर नाही.
‘स्मरणशक्ती कशी वाढवावी’ – ले.रा.स.जोशी या पुस्तकावर 9-3-1926 रोजी परीक्षण लिहिले आहे. परीक्षकाचे नाव कळू शकत नाही.
परीक्षण असे. –
‘रानडे यांचे पर्पेच्युअल कॅलेंडर’ (सर्वकालीन कालदर्श) परीक्षकाचे नाव आणि परीक्षणाचा दिनांक आढळत नाही, परीक्षण असे –
हा कालदर्श फारच चांगला साधला आहे. कल्पकतेचा उपयोग करून आदर्श बनविला आहे. त्याबद्दल रा.रानडे यांचे सकौतुक अभिनंदन करणे योग्य आहे. संस्थेच्या अडचणीमुळे बक्षिस देता आले नाही तरी पसंतीदर्शक व अभिनंदनपर पत्र पाठविणे उचित होईल.
(एकच परीक्षण उपलब्ध आहे.)
वेदाच्या काळाचा इतिहास – ले. थत्ते, परीक्षक चिं.वि.वैद्य
हिंदुस्तानचा भूगर्भशास्त्रीय इतिहास मला अवगत नसल्याने पुस्तक समग्र वाचता आले नाही व कळलेही नाही. कित्येक मते ग्रंथकर्त्यांची मला बरी वाटली नाहीत. पण ही गोष्ट मतवैचित्र्याची आहे पुस्तक मधून मधून मी वाचले. त्यावरून यातली मराठी भाषा सुगम व सरळ नसून विषयाची मांडणीही दुर्बोध आहे. विषयही बहुतेक कल्पनेवर रचण्याचा असून ऐतिहासिक अनुमान दृढता दिसत नाही. यातील ऋचांचे लावलेले अर्थ कितपत ग्राह्य आहेत हे ठरविणे कठीण आहे. पण त्यात ऐतिहासिक दृष्टि लावलेली नाही, असे मला वाटते. तथापि या विषयावर मत देण्यास योग्य नाही.
या पुस्तकावर दुसरे परीक्षण आहे, पण परीक्षकाचे नाव नाही. त्यात म्हटले आहे –
थत्ते यांनी 370 पानावर आधारभूत ग्रंथांची यादी दिली आहे. तींत 12 ग्रंथ नमूद केले आहेत. पण याशिवाय रामायण, महाभारत वगैरे आणखी 25 ग्रंथ नमूद करावयास हवे होते. मी त्यापैकी दोनचार पुस्तके वाचली असतील नसतील. त्यामुळे प्रस्तुत ग्रंथावर मत देण्याचा मला अधिकारच नाही.
वरील दोन परीक्षणे वाचल्यावर कोणालाही सहजच मनात येईल की या दोघा परीक्षकांनी ग्रंथ स्वीकारलाच का? मत देण्याचा अधिकार नाही, ग्रंथ पूर्ण वाचला नाही, मला कळला नाही, असे लिहून वर मतप्रदर्शन केलेच आहे. असे केल्याने इतरांची मने अकारण कलुषित होतात. परीक्षकांनी जबाबदारीने लिहीणे आवश्यक आहे.
त्या आधीच्या परीक्षणात ना.सी.फडके यांच्या कादबंरीवर परीक्षण आहे. लेखक प्रसिध्द असला तरी परीक्षकाने त्याचा प्रभाव पडू न देता सडेतोड मते व्यक्त केली आहेत. गुण आणि दोष दोन्ही दाखवले आहेत, ब्राम्हण कुमारिकेची गर्भपात शस्त्रक्रिया दाखवल्या बद्द्ल परीक्षकाने नाराजी व्यक्त केली आहे. त्यावरून त्या काळातील समाजाची मानसिकता लक्षात येते. कादंबरी सरस उठलेली नाही या वाक्यातील उठलेली हा शब्द प्रयोग आजच्या काळाच्या तुलनेत वेगळा वाटतो. आपण सरस उतरलेली किंवा ‘वठलेली’ असे शब्द वापरतो. नव्वद शंभर वर्षांपूर्वी कादंबरी लेखन मोठ्या प्रमाणावर होत होते, असे दिसते.
‘स्मरणशक्ती कशी वाढवावी’ आणि ‘पर्पेच्युअल कॅलेंडर’ या पुस्तकांवरून असे दिसते की, शंभर वर्षांपूर्वी सुध्दा असे विषय हाताळले जात होते.