महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था

महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था गेली १२३ वर्षे उत्कृष्ट मराठी ग्रंथांना पुरस्कार देऊन उत्तेजन देण्याचे कार्य करीत आहे. ही संस्था महाराष्ट्रातील सर्वांत जुनी साहित्य संस्था आहे. आधुनिक महाराष्ट्राचे आद्द्य प्रवर्तक न्या. महादेव गोविंद रानडे, जागतिक कीर्तीचे संस्कृत पंडित डॉ. सर रामकृष्ण भांडारकर, प्रसिद्ध कादंबरीकार हरि नारायण आपटे, भारतीय अशांततेचे जनक लो. बाळ गंगाधर टिळक इत्यादी पंचवीस द्रष्ट्या महाराष्ट्रीय समाजधुरीणांनी ही संस्था इ. स. १८९४ मध्ये २९ ऑक्टोबर रोजी स्थापन केली. मराठी भाषेच्या आणि साहित्याच्या अभ्युदयासाठी कार्य करण्याचे उद्दिष्ट त्यामागे होते. त्यावेळी संस्थेचे नाव ठेवले डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रान्सलेशन सोसायटी.

~ संस्थापक ~

लो. बाळ गंगाधर टिळक

डॅा. सर रामकृष्ण भांडारकर

न्यायमूर्ती म. गो. रानडे

संस्थेच्या योजना

दक्षिणा भवन

पुण्यात पौड रस्त्यावर चांदणी चौकाजवळ वेदभवनच्या शेजारी ‘दक्षिणाभवन’ ही वास्तू उभारण्याची योजना तयार आहे.

सिंहावलोकन व्याख्यानमाला

दरवर्षी मार्च महिन्यात बी.ए. व एम. ए. च्या विद्यार्थ्यांसाठी ‘सिंहावलोकन व्याख्यानमाला’ सुरू करायची आहे.

भाषा शुद्धी मोहीम

वृत्तपत्रे, रस्त्यांवरील पाट्या अशा सार्वजनिक ठिकाणी अशुद्ध भाषेचा वापर टाळण्यासाठी भाषाशुद्धी मोहीम राबविण्याचे ठरविले आहे.

कागदपत्रांचे जतन

संस्थेजवळील जुन्या ऐतिहासिक महत्त्वाच्या कागदपत्रांचे जतन करण्याच्या दृष्टीने लॅमिनेशन करायचे आहे.

संस्थेचे कार्य

  • मराठी भाषेत प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांचे परीक्षण करून उत्कृष्ट पुस्तकांना पारितोषिक देऊन त्या पुस्तकांच्या लेखकांना प्रोत्साहित केले.
  • जुन्या दुर्मीळ कागदपत्रांचे जतन: या कार्यासाठी शासनाकडून आतापर्यंत एक लाख रूपये अनुदान मिळाले असून त्यातून न्या. रानडे यांचा पत्रव्यवहार व अन्य महत्त्वाची कागदपत्रे लॅमिनेशन करून ठेवली आहेत.
  • मराठी भाषेविषयी मराठी मुलांतच अज्ञान दिसून येते. हे लक्षात घेऊन मराठी मुलांना मराठी भाषेची ओळख व्हावी, भाषा शुद्ध बोलता व लिहिता यावी यासाठी दरमहा संस्थेतर्फे ‘भाषा-पत्र’ प्रसिद्ध करण्यात येत होते. हीच मासिक भाषापत्रे एकत्र करून संस्थेने त्यांची एक पुस्तिका प्रसिद्ध केली आहे.
  • पुण्यातील वनाझ कंपनीचे पूर्वीचे मालक कै. सं. कै. खांडेकर यांच्याकडून जिल्हाधिकारी, पुणे यांच्यामार्फत संस्थेने दहा हजार चौरस फूट जमीन देणगीच्या स्वरूपात मिळवली असून त्या व्यवहारावर शासनाचे शिक्कामोर्तब झाले आहे.
  • सन १८२५ ते सन १९२५ या कालावधीत मराठी भाषेत प्रसिद्ध झालेल्या ग्रंथांची विषयानुक्रमाने संगतवार यादी संस्थेने केली आहे.
  • संस्थेने १९५१-५२ साली ग्रंथ प्रकाशनाची नवीन योजना तयार केली. त्यानुसार डॉ. ग. वा. तगारे यांचे ‘पातंजल योगशास्त्र’ हे प्रथम प्रकाशित केले.
  • सन १९७३ पासून दक्षिणा पारितोषिक प्रबंध स्पर्धा संस्थेने सुरू केली. या योजनेतून आतापर्यंत ३० प्रबंध संस्थेच्या संग्रही जमा झाले आहेत.

छायाचित्र दालन