संस्थेकडील पत्रव्यवहार

निवडक पत्रव्यवहार

1. सातारचे पारसनीस यांचे संस्थेस आलेले पत्र

आपली संस्था नुकतीच स्थापन झाली आहे. तरी सांप्रत चालू असलेल्या तिच्या विविध प्रयत्नांवरुन तिच्या हातून महाराष्ट्र ग्रंथ भांडारात अखंड चमकणारी दिव्य रत्ने निर्माण होतील, अशी आशा बाळगण्यास बरीच जागा झाली आहे व त्याबद्द्ल सदर संस्थेच्या उत्पादकांचे व चालकांचे प्रत्येक महाराष्ट्र भाष्याभिमान्याने व कृतज्ञ अन्तःकरणाने अभिनंदन केले पाहिजे.

मी लिहिलेले दोन ऐतिहासिक ग्रंथ बुक पोस्टाने प्रेमपूर्वक सादर केले आहेत. 1) झाशी संस्थानच्या महाराणी लक्ष्मीबाई साहेब यांचे चरित्र. ही माझी अल्प कृती सर्व महाराष्ट्र वाचंकांस प्रिय झाली असून, हिंदुस्थानातील इतर भाषांत त्यांची भाषांतरे होत आहेत. इंग्रजीतही होण्याचा संभव आहे. 2) दुसरा ग्रंथ मराठ्यांचे पराक्रम – बुंदेलखंड प्रकरण. सरदार गोविंदपंत बुंदेले ह्यांच्या घराण्याचा इतिहास या ग्रंथात आहे. तत्सबंधाने बुंदेलखंडात स्वतः जाऊन व तेथे मराठे जहागिरदारांच्या गाठी घेऊन त्यांच्याकडून मिळालेल्या अस्सल कागदपत्रांच्या आधारे तो लिहिला आहे. हा भाग मराठ्यांच्या इतिहासात आजपर्यंत अनुपलब्ध असून तो कोणीच लिहिला नव्हता.

ही दोन पुस्तके आपल्या संस्थेच्या आदरास पात्र झाली तरी आणखी मराठ्यांच्या इतिहासांतील दुसर्‍या कित्येक अनुपलब्ध व अप्रसिध्द परंतु महत्त्वाच्या भागासंबंधाने केलेले प्रयत्न महाराष्ट्र भाषाभिज्ञ जनांस सादर करण्याचा माझा उद्देश आहे. शिवाजी व शाहू महाराजांची मोगलांशी झालेली राज्यकारस्थाने व तिकडून (दिल्लीहून) आलेली अस्सल पत्रे ह्यांचा इतिहास (ह्यातील काही भाग माझे एक विद्वान मित्र लंडन येथील रॉयल एशियाटिक सोसायटीपुढे मांडणार आहेत) तंजावर संस्थानचा व विशेषकरुन कर्नाटकातील महाराष्ट्र राज्य सत्तेचा संपूर्ण इतिहास (ह्यांचे प्रारंभीचे दोन-चार लेख केसरीमध्ये गेल्या वर्षी प्रसिध्द झाले आहेत.) त्यांची सर्व माहिती तंजावरहून व विलायतेहून मुद्दाम आणली असून तो अतिशय महत्त्वाचा इतिहास होणार आहे.

टिप्पणी –

संस्थेच्या स्थापनेनंतर थोड्याच अवधीत संस्थेची ख्याती पसरु लागली होती, असे दिसते.

संस्थेच्या उत्पादकांचे व चालकांचे अभिनंदन केले पाहिजे. सदर पत्राच्या या वाक्यातील उत्पादकांचे हा शब्द लक्ष वेधून घेतो. ‘संस्थापक’ या अर्थाने तो वापरला आहे. एका इतिहासकाराने, लेखकाने तो वापरला आहे, हे विशेष लक्षात घेण्यासारखे आहे. संस्थेची निर्मिती करणारे या भूमिकेतून उत्पादक हा शब्द उत्पन्न झाला असावा.

मराठ्यांच्या इतिहासातील बुंदेलखंडविषयक भागांवर संशोधनपर पुस्तक उपलब्ध आहे आणि त्याची इतर भाषांत भाषांतरेही होत आहेत ही माहिती या पत्रातून मिळते. पारसनीस यांनी स्वतः बुंदेलखंडात जाऊन अस्सल कागदपत्रे व तोंडी माहिती मिळवून त्या आधारे पुस्तक लिहिले आहे, ते इतिहास संशोधकांच्या दृष्टीने महत्त्वाचे.

2. संस्थेच्या एका फाईलमध्ये एक टाइप केलेले पत्रक आढळले. त्यावर दिनांक आहे 7 जून 1896. पत्रक पुढील प्रमाणे –

Deccan Liberal Association

7.6.1896 रोजी मीटिंग झाली, त्यावेळी वरील नावाची असोसिएशन स्थापन करण्याचा निर्णय झाला. 37 जणांनी सभासद होण्याचे मान्य केले. त्यांचे यादीत न्या. रानडे यांचे नाव पहिले, तात्पुरती कार्यकारणी स्थापन केली. रावबहादूर एस. बी. जठार चेअरमन, एस. आर. हातवळणे, के. बी. मावळणकर, एच. एन. आपटे यांची चिटणीस म्हणून नियुक्ती झाली.

लोकांनी या असोसिएशनचे सदस्य व्हावे असे पत्रक वरील चौघांच्या सहीने छापले आहे. उत्तरासाठी पुढील पत्ता दिला आहे.

एस.आर. हातवळणे, घर नं. 444, सदाशिव पेठ, पुणे.

Liberlising and emancipatory elements गेली 50 वर्षे कार्यरत आहेत. पण ते थोडे आणि विखुरलेले आहेत. वैयक्तिक, प्रयत्नांना यश येणे कठीण म्हणून सर्वांना एकत्र आणून संघटित प्रयत्न करणे आवश्यक. म्हणून ही संघटना स्थापन होणे आवश्यक.

उद्दिष्ट/विशेष लक्ष या मुद्यांकडे देणार

सामान्य

 • राजकीय प्रगतीबरोबरच भौतिक, नैतिक, शैक्षणिक आणि सामाजिक प्रगती दक्षिणेत व्हावी.
 • सामाजिक परिषद अशाच इतर उदारमतवादी संघटना यांच्या उद्दिष्टांबाबत सहानुभूती दाखवणे.
 • सामाजिक परिषद संपूर्ण भारतासाठी जे करीत आहे, ते दक्षिणेसाठी करायचे.

खास उद्दीष्टे

 • गृहशिक्षण आणि शिस्त यांचे महत्त्व लोकांना पटवून देणे.
 • विवाहाचा प्रश्न (खर्च कमी करणे, विवाह उशिरा करणे, एकाच जातीत आंतरविवाह (उपजाती) करण्यास उत्तेजन देणे.)
 • परदेश प्रवासाच्या मार्गातील अडथळे दूर करणे.
 • महिलांच्या कनिष्ठ आणि उच्च शिक्षणात सुधारणा करणे - शिक्षण लोकप्रिय करण्यासाठी.
 • दारूसह मादक द्रव्यांना बंदी.
 • सामाइक राष्ट्रीय भाषेचा प्रश्न.
 • विज्ञान आणि अन्य उपयुक्त विषयांवर व्याख्याने देऊन त्याद्वारा लोकशिक्षण.
 • हिंदू बाल विधवांची स्थिती सुधारणे.
 • नैतिक शिक्षण आणि नैतिक शिस्त यांवर भर देण्याची आवश्यकता.
 • प्राथमिक मोफत शिक्षण.

सर्व प्रश्न एकाच वेळी घेतले जाणार नाहीत. या कार्यक्रमाला चिकटून राहू.

(संस्थेच्या छापील कार्डावर (सन 1900) सभेची वेळ लिहून 5-30, पुढे कंसात (मद्रास टाईम) असे लिहिले आहे.

टिप्पणी –

शंभर वर्षांपूर्वी जे सामाजिक प्रश्न ज्वलन्त समजले जात होते, असे वरील पत्रकावरुन दिसून येते, त्यातील बहुसंख्य प्रश्न आजही ज्वलन्त आहेत. उदा. दारूबंदी, नैतिक शिक्षण, शिस्त. शंभर वर्षांपूर्वी मद्रासची वेळ महाराष्ट्रात प्रमाण (स्टॅंडर्डटाईम) मानत असत असे दिसते.

3. सय्यद करीम या नागरिकाने 17-8-1895 रोजी संस्थेस लिहिलेले पत्र –

मी आपला अमोल्यवान वेळेत अडथळा आणू इच्छित नाही. तरी परस्परांवर परस्परांनी उपकार करावा हा मानव धर्म समजून अशी आशा करीत आहे की तसदी दिल्याबद्द्ल क्षमा करून व देश अभिमान राखुन आपण जर खाली लिहिलेल्या चार ओळीस रुकार देतील व मजला मदत करतील.

मी जातीचा यवन आहे, हे लिहिण्यास न लगे कारण की, पहिल्याने तर या पत्रातच शेकडो चुका असाव्यात, दुसरे मी एक लहानसे पुस्तक, हलबनामक शहरांतील डल्ला बाईच्या अद्भुत चमत्काराबद्दल उडदु भाषेत होते त्याचे मराठी भाषेत मी माझ्या शक्ती प्रमाणे भाषांतर केले आहे.

सदर पुस्तकाबाबत दक्षिणा प्राईज कमिटीकडे लिहीले असता त्यांनी आज रोजी आपल्या घराची वाट दाखवली. त्यांचे मी फार अभिनंदन करतो. मी त्यांचा फार आभारी आहे.

हल्ली मजला या कामात इतके श्रम करण्याचे कारण इतकेच की, ही भाषा दिवसेंदिवस नाहीशी होत चालली आहे. शिवाय आमची यवन लोकांची बुध्दी उत्तरोत्तर मंद होत चालली आहे. हे प्रकार सर्व आपल्या डोळ्यांसमोर आहेतच. तशात मी जे पुस्तक तयार केले आहे ते जर आपल्या सारख्या सर्वमान्य गृहस्थांच्या नजरेखालुन न गेले तर ते माझे केलेले सर्व श्रम निरर्थक होणार आहेत .

स्वप्न संसार निष्फलम त्याप्रमाणे होते.
आपला एक यवन
सय्यद करीम

टिप्पणी -

सदर पत्र स्वतःच खूप बोलके आहे. टिप्पणीची आवश्यकता नाही.

4. मोरो विनायक शिंगणे रा. निगदवनी लेन, कांदेवाडी, गिरगाव, मुंबई, या गृहस्थांनी दि. 22-1-1896 रोजी संस्थेस लिहिलेले पत्र. त्यांनी कन्या विक्रय दुष्परिणाम नाटक हे पुस्तक संस्थेकडे पाठवले आहे. ते लिहितात –

हल्ली कन्या विक्रय किती झपाट्याने चालला आहे व त्यामुळे आपल्या आर्यभगिनी अनेक त-हेच्या विपत्तीत कोणत्या त-हेने पडत आहेत. वगैरे संबंधी माहिती आपणास आहेच. नॅशनल सोशल कॉन्फरन्सने आपल्या ठरावात कन्या विक्रय निषेध हाही एक विषय ठेवला होता. व आपल्या सारख्यांनी हा विषय हाती धरल्यावर लवकरच लोकांचे डोळे उघडून आमच्या आर्यभगिनीस सुखाचे दिवस येतील अशी सबळ आशा वाटते.

नॅशनल सोशल कॉन्फरन्सच्या वेळी फुकट वाटण्याकरीता 50 पुस्तके रावबहादुर न्या. रानडे यांच्याकडे दिली होती. ती वाटली गेली असतीलच. माझ्या प्रयत्नांस थोडेसे यश आले ते असे - सात जणांनी आपला कन्या विक्रयाचा निश्चय सोडून देऊन आपल्या मुली फुकट दिल्या, हे कळविण्यास मोठा आनंद वाटतो. सदरहू प्रकार या पुस्तकाच्या वाचनाने झाला त्याबद्दल मला अभिमान वाटतो.