स्थापक न्या. रानडे यांचा अल्प परिचय

आधुनिक भारताचे प्रवर्तक आणि संस्थेचे संस्थापक न्या. रानडे यांचा अल्प परिचय

जन्म: १८ जानेवारी १८४२ रोजी नाशिक जिल्ह्यातील निफाड गावी.

शिक्षण व नोकरी: सन १८६२ मध्ये बी. ए. परीक्षा उत्तीर्ण. सन १८६५ मध्ये एम. ए. झाले. १८६६ च्या उत्तरार्धात त्यांनी ओरिएंटल ट्रान्स्लेटरचे काम पाहण्यास प्रारंभ केला. हे काम करीत असतानाच त्यांना मुंबई सोडून अक्कलकोट येथे कारभारी म्हणून आणि कोल्हापूर येथे न्यायाधीश म्हणून जावे लागले.

सन १८६८ मध्ये प्रोफेसर म्हणून कायमस्वरूपी नेमणूक झाली. परंतु पुढील दोन अडीच वर्षांच्या काळात त्यांना कधी स्मॉल कॉज कोर्टाचे जज्ज कधी पोलीस मॅजिस्ट्रेट तर कधी हाय कोर्टाचे डेप्युटी अगर असिस्टंट रजिस्ट्रार म्हणून काम पहावे लागले. सन १८७१ मध्ये ऍडव्होकेटची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर पुण्यास न्याय खात्यात त्यांची कायमस्वरूपी नेमणूक झाली.

सन १८६६ मध्ये दक्षिणा प्राइझ कमिटीवर सभासद म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली.

सन १८९३ (२३ नोव्हेंबर) मधे त्यांनी मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती पदाची सूत्रे हाती घेतली. अखेरपर्यंत ते त्या पदावर होते.

सामाजिक कार्य: स्त्रियांचे शिक्षण, मुलांबरोबर सहशिक्षण, विधवा विवाह, केशवपनाला बंदी, मुलामुलींच्या विवाहासाठी वयोमर्यादा, जातिनिर्मूलन, अस्पृश्यता निवारण या प्रकारच्या सामाजिक सुधारणांसाठी त्यांनी आयुष्य वेचले. स्त्रियांनी स्वावलंबी व्हावे (आर्थिक दृष्ट्या) असा त्यांचा प्रयत्न होता. रानडे यांच्या या सामाजिक सुधारणा विषयक कार्याला सनातन्यांकडून कडाडून विरोध होत राहिला. पण त्यांचे कार्य चालूच राहिले.

देशाला स्वातंत्र्य मिळाले तर ते पेलवण्याची क्षमता समाजात असणे आवश्यक आहे. त्यासाठी सामाजिक सुधारणा आणि शिक्षण या गोष्टी आवश्यक आहेत, असे त्यांचे मत होते.

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी निरनिराळ्या क्षेत्रात कार्य करणार्‍या संस्था त्यांनी पुण्यात स्थापन केल्या.

  • महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था – सन १८९४
  • वेदशास्त्रोत्तेजक सभा – सन १८७५
  • वक्तृत्वोत्तेजक सभा
  • सार्वजनिक सभा – सन १८७०
  • प्रार्थना समाज (मुंबई) – सन १८६७
  • हुजूरपागा
  • नेटीव्ह जनरल लायब्ररी
  • इंडस्ट्रीयल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया
  • भारतीय सामाजिक परिषद

याशिवाय भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या स्थापनेत त्यांचा मोठा वाटा होता. हाच आत्ताचा कॉंग्रेस पक्ष.

पहिले मराठी ग्रंथकार संमेलन न्या. रानडे यांनी भरवले. त्यातूनच पुढे अ. भा. मराठी साहित्य संमेलन भरण्यास प्रारंभ झाला.

काही लक्षणीय नोंदी

  • सन १८८२-८४ दरम्यान भारतात मोठा दुष्काळ पडला. न्या. रानडे यांनी या दुष्काळाची पाहणी करून अहवाल तयार केला. दुष्काळावर भारतात तयार झालेला हा पहिला अहवाल होय.
  • न्या. रानडे यांनी भारतात संस्थात्मक जीवनाचा पाया घातला.
  • माधवरावांची सल्लामसलत किंवा प्रोत्साहन ज्याला लाभले नाही असे सार्वजनिक हिताचे एकही कार्य त्यांच्या हयातीच्या काळात दाखवता येणार नाही, असे न. र. फाटक यांनी म्हटले आहे.
  • मराठी भाषा ग्रंथालयांची आवश्यकता त्यांनी एकदा बोलून दाखवली. त्यानंतर थोड्याच वर्षांत ठाण्यात आणि पाठोपाठ मुंबईत मराठी ग्रंथसंग्रहालय जन्मास आले.

न्या. रानडे यांच्याविषयी डॉ. आंबेडकर म्हणतात – हिंदुस्थानाच्या (अर्वाचीन) इतिहासात विद्वत्ता, व्यवहारचातुर्य आणि दूरदृष्टी या गुणात रानड्यांच्या जोडीला बसवण्याजोगी दुसरी व्यक्ती सापडणे कठीण आहे. ज्ञानाच्या विषयाला स्पर्श केला व त्या विषयात रानड्यांनी पारंगतता मिळवली नाही असा खरोखर एकही विषय दाखवता येणार नाही.

न्या. रानडे यांनी लिहिलेली आणि त्यांच्याविषयी लिहिलेली काही पुस्तके

  • द राइझ ऑफ मराठा पॉवर – न्या. म. गो. रानडे
  • न्या. म. गो. रानडे: व्यक्ती, कार्य आणि कर्तृत्व – त्र्यंबक कृष्ण टोपे - १९९२
  • पुनरुत्थानाचे अग्रदूत – म. गो. तथा माधवराव रानडे यांचे चरित्र – ह. अ. भावे -२०१३
  • आमच्या आयुष्यातील काही आठवणी – रमाबाई रानडे – १९१०
  • न्या. महादेव गोविंद रानडे चरित्र – न. र. फाटक – १९२४
  • रानडे – प्रबोधन पुरुष – डॉ. अरुण टिकेकर -२००४
  • महादेव गोविंद रानडे (इंग्रजी) – टी. व्ही. पर्वते – १९६३
  • मिस्टर जस्टिस एम. जी. रानडे – अ स्केच ऑफ लाइफ ऍंड वर्क (इंग्रजी) – जी. ए. मानकर
  • रानडे: द प्रॉफेट ऑफ लिबरेटेड इंडिया (इंग्रजी) – डी. जी. कर्वे -१९४२.