मराठी भाषेचा मूलभूत इतिहास

प्राकृत भाषा म्हणजे संस्कृतीच्या संस्कारापासून आणि व्याकरणाच्या नियंत्रणापासून अलिप्त अशी सामान्य जनतेची स्वभावसिद्ध बोली भाषा.

संपूर्ण देशात एक हजार प्राचीन लेणी आहेत. त्यातील ८०० महाराष्ट्रात आहेत. त्यातील सर्व कोरीव लेख मराठीत आहेत.

अनेक संशोधनांच्या आधारे एक सुसंगत आराखडा मांडायचा झाल्यास महारठ्ठी किंवा महाराष्ट्री म्हणजेच मराठी भाषा ही किमान अडीच हजार वर्षे जुनी असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. डॉ. श्री. व्यं. केतकर आणि राजारामशास्त्री भागवतांनी मराठीचे वय सुमारे तीन हजार वर्षे ठरवलेले आहे. शेकडो पुराव्यांवरून मराठी ही संस्कृत भाषेपासून जन्माला आली नसून ती संस्कृत इतकीच जुनी भाषा आहे असे केतकर आणि भागवतांनी दाखवून दिलेले आहे. मराठी ही संस्कृतची मुलगी नाही. ती पाली, पैशाची, शौरसेनेची सख्खी बहीण आहे. संस्कृतचीही ती बहीणच ठरते. दुर्गा भागवतांनी राजारामशास्त्री भागवतांच्या संशोधनाचा निष्कर्ष सांगताना म्हटले आहे की जुनी महाराष्ट्री ही संस्कृतपेक्षा जुनी व खरी जिवन्त भाषा आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे.

गाथा सप्तशती हा प्राचीन मराठीतील पहिला ग्रंथ. हाल हा त्याचा लेखक. सप्तशती म्हणजे सातशे आणि गाथा म्हणजे कविता. प्रत्यक्षात त्या १००८ कविता आहेत. अस्सल मराठमोळे नागरी ग्रामीण व वन्य लोकजीवन या गाथेत ललितमधुर सौंदर्याने नटलेले आहे. शृंगाराबरोबर जीवनाची करूण, दारूण आणि हृद्य अशी सर्व अंगे सारख्याच कुशलतेने गाथा सप्तशतीत रेखाटली आहेत.

मराठी बोलणारे लोक आज १०० देशात पसरलेले आहेत. मराठीत दरवर्षी सुमारे दोन हजार पुस्तके प्रकाशित होतात. पाचशे दिवाळी अंक निघतात. छोटी मोठी सुमारे दोनशे साहित्य संमेलने होतात. देशातील एकूण ग्रंथालयांपैकी २५ टक्के ग्रंथालये एकट्या महाराष्ट्रात आहेत.